रोनाल्ड डाइबर्ट यांच्या "The Road to Digital Unfreedom: Three Painful Truths About Social Media." या संशोधन लेखाचा केलेला अनुवाद.
अनुवादक: हरेश अ. खैरनार, सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, एच.पी.टी. आर्ट्स व आर.वाय.के. सायन्स कॉलेज, नाशिक.
© Deibert, Ronald. "The Road to Digital Unfreedom: Three Painful Truths About Social Media." Journal of Democracy 30:1 (2019), 25-39. © 2019 National Endowment for Democracy and the Johns Hopkins University Press. Reprinted with permission of Johns Hopkins University Press.
अलीकडे समाज माध्यमांची क्षति झालेली दिसते. समाज माध्यमांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बलाढ्य कंपन्यांबरोबरच बहुतांश इंटरनेटची चकाकी झीजली आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर व इतर समाज माध्यमांना त्यांच्या नकारात्मक बाह्यते मुळे खोलवर तपासणीला सामोरे जावे लागले आहे. महत्वाच्या राजकीय घटनांच्या परिणामांवर प्रभाव टाकण्यासाठी समाज माध्यमांचा केला गेलेला गैरवापर हा अशा चिंतेचा केंद्र आहे ज्यामध्ये युके मधील जुन २०१६ चे ब्रेक्झीट सार्वमत, आणि अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांचा समावेश होतो. दोन्ही प्रकरणात राज्य आणि राज्येत्तर कर्त्यांनी त्यांच्या “माहिती प्रचालना” ची (information operations) मोहीम राबविण्यासाठी समाज माध्यमांचा उपभोग घेतला, चालाखीने हाताळले व त्याचा गैरवापर केला आहे असा निष्कर्ष विविध अभ्यास आणि गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून पुढे आला आहे. समाज माध्यम विश्लेषकी (analytics) कंपन्यांनी या घटनांमध्ये निभावलेली भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ज्या पद्धतीने समाज माध्यमे प्रत्यक्षात स्वतःला दर्शवितात आणि अंकीय युगात व्यापकपणे आपण त्यांना जसे समजतो या दोहोंमध्ये वेधक विरोधाभास आहे. समाज माध्यमे माहितीची अधिकाधिक उपलब्धता सक्षम करणारे, सामुहिक संघटन सुलभीकारक व नागरी समाजाला बळ देणारे आहे असे समजणे हे एकेकाळी प्रचलित शाहाणपण होते. परंतु सध्यकाळात अशी माध्यमे समाजाच्या पीडानिर्मितीचे योगदानकर्ते ठरत आहेत. अनेक लोकांची आता अशी खात्री झाली आहे की महत्वाच्या सामाजिक आणि राजकीय चर्चांवर समाज माध्यमांचा अतीव प्रभाव आहे. काहींना असे लक्षात येवू लागले आहे की ऑनलाईन पद्धतीने समाज माध्यमांवर वावर करण्यासाठी आपण असमंजसपणे सतत अशा उपकरणांवर टक लावून आहोत परतू प्रत्यक्षात आपण एकमेकांपासून आणि निसर्गापासून तुटले जातोय. अशा वाढत्या अस्वस्थतेचा परिणाम म्हणजे समाज माध्यम कंपन्याना नियमित करण्याचा दबाव वाढत आहे जेणे करून ते त्यांच्या व्यासपीठाचे उत्तम कारभारी बनतील व तसेच खाजगीपणाचा आदर व मानवी अधिकाराची दखल घेणारे ठरतील परंतु अशा नियमनासाठी मुळात चुकीचे काय आहे याची सामाईक जाणीव होणे ही पूर्वावश्यकता आहे.
मोठ्या प्रमाणावर अभ्यासक आणि लोक आता अशा सहमती पर्यंत आले आहे ज्याला मी समाज माध्यमांशी संबंधित “तीन वेदनादायक सत्य” असे संबोधतो: १) समाज माध्यमांचे व्यावसायिक प्रारूप अगाध आणि अथकपणे खाजगी माहितीच्या पाळत ठेवण्यावर व त्याद्वारे जाहिरातींचे लक्ष्य साधण्यावर आधारित आहे; २) आपण अशाप्रकारची आश्चर्यकारक पाळत ठेवण्याची मुभा जरी पूर्णपणे मुद्दाम दिली नसली तरी स्वेच्छेने मात्र दिली आहे; आणि ३) समाज माध्यमे प्राधिकारवादी (authoritarian) प्रवाहांशी विसंगत असणे तर दूर उलटपक्षी अशा प्रवाहांना सक्षम करणारे ठरत आहे. वरील निरीक्षणे पूर्णपणे नवीन नाहीत. तरी त्यांची भर आपल्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाच्या निराशतेचे चित्र मांडते व असे भाकीत मांडते की भविष्य अधिक निराशाजनक असेल. समाज माध्यमांच्या विकृतीचे सामाजिक व राजकीय तात्पर्य अत्यंत क्लेशदायक असतील परंतु जो पर्यंत आपण या प्रश्नांना प्रामाणिकपणे सामोरे जात नाही तो पर्यंत अर्थपूर्ण सुधारणा होण्याची अपेक्षा नाही.
समाज माध्यमे म्हणजे पाळत ठेवणारी भांडवलशाही:
पाळत ठेवणे हे आधुनिकतेचे अंगभूत वैशिष्ट्य आहे आणि कदाचित आपल्या प्रजातीचे देखील. आपण निरीक्षण करतो, भाकीते मांडतो आणि आपल्या आजूबाजूच्या जगाला आकार देतो. कालांतराने आपल्याकडे उपलब्ध असणारी अशी साधने अत्याधुनिक आणि व्यापक झाली. किमान प्रबोधनापासूनच मानव अशा मार्गावर चालतोय जिथे असा विश्वास आहे की अधिक माहिती असणे अधिक चांगले आहे. परंतु हि सहजप्रवृत्ती प्रतिपरिणामकारक (counter productive) ठरू शकते का, विशेषतः अंकीय तंत्रज्ञानाच्या आश्चर्यकारक सामार्थ्यात मिसळल्यास?
आता याचे स्मरण करून देणे उपरोधिक ठरेल की एकेकाळी इंटरनेटद्वारे नफा कसा कमावता येईल याबाबत लोक व्याकुळ असायचे. १९९० च्य दशकातील डॉट कॉम फुगवटा आणि त्यानंतर त्याचे चक्काचूर होणे यामुळे माहितीवर आधारित नवीन अर्थव्यवस्थेचा “अविवेकी उत्साह” प्रकाशझोतात आला. परंतु लवकरच गुगल, फेसबुक आणि इतर कंपन्यांनी नाविन्यतेने इंटरनेट द्वारा महसूल कसा खेचायचा याचे एक ताजे प्रारूप तर दिलेच शिवाय त्यांनी एका अशा अमुलाग्र नवीन उत्पादन साधनाचे नेतृत्व केले ज्यामुळे जगामध्ये परिवर्तन झाले. “खाजगी-माहिती पाळतखोर अर्थव्यवस्था” (personal-data surveillance economy) किंवा “पाळतखोर भांडवलशाही” (surveillance capitalism) अशा अर्थाने ओळखले जाणाऱ्या ह्या साधनाचा गाभा एक सरळ व्यवहार आहे: ग्राहकांना सेवा पुरवली जाईल (बहुतांशी विनामुल्य) व दरम्यान या क्रियेशी संबंधित उद्योग उपभोक्त्याच्या वर्तनावर देखरेख ठेवतील ज्यामुळे जाहिराती त्यांच्याशी जुळवता येतील.
अशा माध्यमातून अब्जो डॉलर कमावणाऱ्या कंपन्याच्या स्वाभाविकपणे कल स्वतःचे वर्णन निर्दोष अविर्भावात करण्याकडे असतो. उदाहरणार्थ फेसबुक त्यांच्या वापरकर्त्यांचा उल्लेख “ग्राहक” असे न करता “समुदाय” असा करते. गुगल असे म्हणते की त्यांचे ध्येय “जागतिक माहितीचे संघटन करणे व ती सर्वांसाठी सुगम व उपयुक्त करणे” हे आहे आणि यातून गुगल अधिक सौम्य आणि सक्षमीकारक आहे हे प्रतीत होते पण वास्तवात ते एक प्रचंड वाणिज्यिक-पाळतखोर व्यवस्था आहे.
पाळतखोर भांडवलशाहीचा एक अविचलीत तर्क आहे. असे उद्योग नाविन्याचा जो निरंतर शोध घेत आहे त्यातून हे प्रगट होते की हा तर्क शक्य तेवढ्या अधिकाधिक उपभोक्त्यांची सूक्ष्म, परस्परव्यापी, विभाजित स्त्रोतातून माहिती मिळविणे हे लक्ष्य ठेवतो. आपल्या सवयी, सामाजिक संबंध, आवड, मत, विचार, उर्जा उपभोग, हृदयाचे ठोके, अगदी आपल्या झोपेचे प्रारूप आणि स्वप्ने यासंबंधित माहिती बिंदू मिळवून ती अधिक कल्पक, व्यापक, आणि अचूक पद्धतीने इतर माहिती बिंदूशी सहसंबंधित केले जात आहे. त्यानंतर संगणक अशी माहिती पृथक करून तिचे विश्लेषण करते आणि त्याद्वारे अधिक परिष्कृत व वैयक्तिकृत जाहिराती आपल्यावर लक्ष्य केल्या जातात जेणेकरून आपण त्या ऑनलाईन बघू. अशा उद्योगांच्या दृष्टीने कधीही खूप जास्त माहिती आहे असे होवूच शकत नाही. संपादन आणि नियंत्रण मिळविण्याच्या या अंतहीन शोध मोहिमेत संवेदकामागे (sensor) संवेदक तयार केले जात आहेत.
फेसबुकने दाखल केलेल्या एकस्व (patent) अर्जातून सदर कंपनी “तंत्रज्ञान कुठे जाणार आहे” याबाबत काय विचार करते याचे एक मानचित्रच मिळते. कंपनीने असे एकस्व काढले आहे ज्याद्वारे उपभोक्ता कितीवेळा आपल्या मित्राला भेटतो या आधारावर ते प्रेमळ संबंधामध्ये आहेत का, त्यांचे लिंग आणि इतर निर्देशक यांचा अनुमान लावता येईल. कंपनीचे अजून एक एकस्व याबाबत आहे की तुमच्या स्तंभाचा (post) आशय तपासून तुमच्या व्यक्तिमत्वामधील बहिर्मुखता, खुलेपणा आणि भावनिक स्थिरता याबाबत अनुमान मांडता येईल. अजून दुसरे एकस्व अशा तंत्रज्ञानाच्या बाबत आहे ज्याद्वारे क्रेडीट कार्ड चे व्यवहार आणि उपभोक्त्याचे स्थळ या आधारावर जाहिरातदाराला हे सांगता येवू शकेल की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आता महत्वपूर्ण घटना घडणार आहे जसे कि पदवी संपादन किंवा बालकाचा जन्म. छायाचीत्रकाच्या भिंगावरील (camera lens) ओरखड्याद्वारे विशिष्ट ओळखचिन्ह तयार करणे आणि दूरचित्रवाणीच्या विद्युत तारेमध्ये येणाऱ्या अडथळ्यावर लक्ष ठेवून त्याद्वारे एखादा व्यक्ती कोणता कार्यक्रम बघत होता हे सांगणे अशा स्वरूपाचे एकस्व अधिकार हे अगदीच भयंकर आहेत.
पाळतखोर अर्थव्यवस्थेच्या अग्रभागी असणाऱ्या अशा नामांकित कंपन्यांच्या पाठीमागे अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या “विश्लेषकी” (analytics) क्षेत्राच्या व्यापारात कार्यरत आहेत. पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या अशा कंपन्या, अग्रभागी असणाऱ्या समाज माध्यम कंपन्यांच्या व्यवसाय बुद्धीतून उगवलेली माहिती गोळा करून नंतर जाहिरातदार व इतरांना ती विक्री करतात. अशा पडद्याच्याही मागे अशा व्यवसायांचा वावर आहे जे विश्लेषकी कंपन्याना गणनविधी (algorithm), अनुदेशन पद्धती (software), तंत्रज्ञान, पाळततंत्र (tradecraft) इत्यादी गोष्टी पुरवितात. त्यानंतर असे व्यवसाय आहेत जे सर्व सुरळीत चालण्यासाठी मुलभूत यंत्रसामग्री, अनुदेशन पद्धती, आणि उर्जा पुरविण्याचे कार्य करतात. बहुतेक उपभोक्ते समाज माध्यमांच्या “दर्शनी खिडकीतच” डोकावतात, आणि व्यवसाय-ते-व्यवसाय पातळीवर कार्यरत असणाऱ्या अप्रसिद्ध उद्योगांबाबत तो पर्यंत त्यांनी ऐकलेले नसते जो पर्यंत त्यांच्या खाजगी माहितीमध्ये बेकायदेशीर प्रवेश होत नाही किंवा अपप्रवाद (scandal) पुढे येत नाही , उदाहरणार्थ २०१८ मध्ये फुटलेले केंब्रीज अॅनालिटीका प्रकरण.
समाज माध्यम कंपन्या त्रयस्थ विकासकांना संगणकीय उपयोजक (application) आणि ग्राहकांच्या माहितीची हाताळणी करण्याच्या इतर सेवा विक्री करून पैसे कमावतात. पडद्या मागच्या माहिती भागीदारीच्या आणि अति नफ्याच्या अशा व्यावसायिक सौद्यांचा अर्थ असाच की एका माध्यमाचा उपभोक्ता नकळत अमाप खाजगी माहिती डझनभर इतर माध्यमांना सुपूर्द करीत आहे. उदा. न्यू यॉर्क टाईम्स च्या तपासणी नुसार अॅमॅझॉन, अॅपल, ब्लॅकबेरी, मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग यांच्याबरोबरच साठ इतर उपकरण निर्माण करणाऱ्या कंपन्यांसोबत फेसबुक ने माहिती-भागीदारी करार केले आहेत. संबंधित पत्रकाराने यापैकी एक अॅप्लिकेशन जेव्हा स्थापित (install) केले तेव्हा असे लक्षात आले की सदर अॅप्लिकेशनला विशेष खूणओळख (unique identifiers) असणाऱ्या भागात प्रवेश मिळाला आणि तसेच फेसबुक वरील त्याच्या अनेक मित्राच्या यादी मधील आणि त्याही पुढे जवळपास तीन लक्ष ऑनलाईन “मित्रांचे मित्र” यादीमधील व्यक्तींच्या खाजगी माहिती मध्ये प्रवेश शक्य झाला.
पाळतखोर अर्थव्यवस्थेने प्रावाहित केलेल्या आर्थिक परिवर्तनाचे मोजमाप कमी लेखने निव्वळ कठीण आहे. पारंपारिक उद्योग देखील खाजगी माहिती संकलन आणि विश्लेषण करणाऱ्या घटकामध्ये रुपांतरीत झाले आहे जरी ते सुरुवातील अशा हेतूने प्रेरित नव्हते. उदाहरणार्थ व्यावसायिक विमानसेवा देणारे आता प्रवाशांची वाहतूक करण्यापलीकडे गेले आहेत. अशा कंपन्या आता माहिती संकलन आणि जाहिरात करणाऱ्या बनल्या आहेत ज्या इतर माहिती संकलित करणाऱ्या घटकांशी जोडले गेले आहेत जसे की हॉटेल शृंखला, टॅक्सि कॅब आणि पर्यटन अशा क्षेत्रातील व्यवसाय. निष्ठा बक्षीस उपक्रमाच्या (loyalty reward) माध्यमातून ग्राहकांच्या आवडीनिवडी, हालचाल, आणि खर्चाच्या सवयी यांवर देखरेख ठेवली जाते. विमानात जागा आरक्षित करण्यासठी, विमानतळावर नोंद करून विमानात प्रवेश करण्यासाठी विमानसेवा कंपनीचे अॅप वापरणे आता अगदी सामान्य झाले आहे. ग्राहकाला याद्वारे सुविधा मिळते. पण याबदल्यात विमान कंपनीला काय मिळते? जसे एअर कॅनडाचे खाजगीत्वाचे धोरण सांगते की त्यांना ग्राहकांची माहिती मिळते ज्याद्वारे विमान कंपनीला हि मुभा मिळते की “ ग्राहकांच्या आवड आणि गरजा या आधारावर उत्पादने आणि सेवा विकसित करून त्याची शिफारस केली जाईल”.
प्रत्येक समाज माध्यमाची उच्चस्तर आणि निम्न स्तरावरील कार्ये आहेत. स्वतःचा मेंदू खिजविन्यासाठी जे अॅप्लिकेशन तुम्ही वापरताय ते निव्वळ एक खेळ असेल , परंतु वास्तवात त्याचे एक दुसरे कार्य आहे ज्या माध्यमातून तुमचे निरीक्षण करून तुमच्या संबंधातील माहिती संकलित केली जाते: तुमचे उपकरण, तुमचे इतर अॅप्लिकेशन , तुमचे संपर्क, छायाचित्र, भ्रमणध्वनी मधिल ठेवण (setting) , भौगोलिक स्थान, आणि बरेच काही. अशा स्वरूपातील उच्चस्तरीय कार्ये साध्य करण्यासाठी, असे अॅप तुमच्या उपकरणाचे विविध भाग जसे की तुमची संपर्क यादीपासून ते तुमच्या उपकरणाची परिचालन व्यवस्था (operating system), उपकरणाची विशेष खूणओळख, अगदी छायाचित्रक आणि ध्वनिग्राहक (microphone) मध्ये सुद्धा प्रवेश मिळविण्याची स्वतःलाच परवानगी देतो. २०१४ मध्ये पीव इंटरनेटरने असे संशोधन केले की एका अँड्रॉईड स्मार्टफोन मधील अॅप २३५ विविध प्रकारच्या परवानग्या मागू शकतो आणि सरासरी अशा परवानग्यांची संख्या पाच आहे.
आपण सहमती देतो (परंतु मुद्दाम नाही):
दुसरे वेदनादायक सत्य म्हणजे अशा सौद्याचे एकतर आपण चाहते झाले आहोत किंवा किमानपक्षी आपण ते स्वाकारले आहे. समाज माध्यमाच्या गैर गोष्टी आणि त्याचे अनपेक्षित परिणाम या संदर्भातील माहिती आणि विशिष्ट समाज माध्यमांचा उदय आणि घसरण याबाबतच्या जाणीवेचा प्रसार तर होत आहेच, परंतु अजूनही समाज माध्यमे हे लोकप्रिय आहेत आणि त्यांची पाळतीवर आधारित असणारी अर्थव्यवस्था सतत विस्तारत आहे.
खात्रीलायक सांगायचे म्हणजे , उपभोक्त्याने केलेल्या निवडीवर तर्कसंगत निर्णयांचा प्रभाव असतो. समाज माध्यमांच्या व्यापकतेमुळे अशा सेवांमध्ये सहभागी होण्याच्या प्रबळ प्रोत्साहक (incentive) आणि निरुत्साहक (disincentive) बाबी निर्माण झाल्या आहेत. किशोरवयीन बऱ्याच वेळा असे भाष्य करतात की ते फेसबुक सोडू शकत नाही कारण त्यांना समाजबहिष्कृतीला सामोरे जावे लागेल. एका लेखकाने ज्याला “सोयी-सुविधांचा साम्राज्यवाद” (infrastructural imperialism) म्हटले आहे ती संकल्पना लागू केल्यास असे म्हणता येईल की संघटना त्यांच्या सेवा मिळविण्याचा सर्वात तत्पर मार्ग म्हणून समाज माध्यमाचे व्यासपीठ देवू करतात,समाज माध्यमात समविष्ट न होणाऱ्यांना वर्जित करतात तर जे समविष्ट होतात त्यांच्या निवडीला सूक्ष्म परंतु प्रबळपने आकार देतात.
परंतु उपभोक्ता जेव्हा समाज माध्यमांमध्ये समविष्ट होतो तेव्हा त्याने केलेली निवड त्याला पूर्णपणे समजलेली असते का? “सेवा शर्तीचे” लांबलचक विवरण असणारे विविध उपयोजक डाऊनलोड करून आपल्या उपकरणात स्थापित करणे हे आता खूप सामान्य झाले आहे आणि कुठल्याही प्रकारे अशा शर्ती प्रत्यक्षात न वाचता, समजून घेणे तर दूरच, आपण “स्वीकारा” चौकटीवर टिकटिक (click) करतो, कारण अशा चौकटीवर टिकटिक केल्याशिवाय कोणीही डाऊनलोड पूर्ण करू शकत नाही. काही वर्षांपूर्वी एका सोफ्टवेअर कंपनीने हे पाहण्यासाठी की कोण शेवटपर्यंत त्यांच्या सेवाशर्तीचे वाचन करतो यासाठी अशा सेवाशार्तीच्या अगदी शेवटी मोफत १००० डॉलर्स देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. चार महिन्यांनी आणि तीन हजार डाऊनलोड नंतर फक्त एका व्यक्तीने ह्या प्रस्तावाच्या बक्षिसावर दावा केला. यामध्ये पुनरावृत्ती मुळे कल्पनाशून्य आणि गुळगुळीत झालेले कायदेशीर शब्दजाल जोडले तर कारारविषयक बंधनांचे आपल्या अज्ञानाचे ढग अधिक दाट होत जातात. थोडक्यात बहुसंख्य वापरकर्ते त्यांनी न जाणून घेतलेल्या सेवाशर्तीना होकार देतात.
बरेच जन हे कबूल करतील की उपलब्ध असणाऱ्या पर्यायांवर विविध नियंत्रणे कार्यरत आहेत, दरम्यान समाज माध्यमांशिवाय एकतरी दिवस घालवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागतिक स्तरावरील एक अभ्यास या संदर्भातील मुलभूत (आणि आपणास कमी प्रमाणात उमजलेली) यंत्रणा अधोरेखित करतो. सदर अभ्यासानुसार “ अभ्यासात समाविष्ट जवळपास सर्वच देशामधील (दहा) बहुतेक विद्यार्थी समाज माध्यमांशिवाय पूर्ण २४ तास राहू शकले नाही आणि त्यांनी स्वतःच्या प्रतिक्रियेचे वर्णन करण्यासठी अक्षरशः एकसारखे शब्द वापरले ज्या मध्ये चिडचिडा, गोंधळलेला, चिंतातुर, शीघ्रकोपी, भयशंकित, बेचैन, अस्थिर, चक्रावलेला, आसक्त, धास्तावलेला, मत्सरी, क्रोधीत, एकाकी, अधीन, उदास, अस्वस्थ आणि विभ्रमी या शब्दांचा समावेश होतो”. थोडक्यात समाज माध्यम हे व्यसनसक्ती यंत्रणा आहे.
समाज माध्यमे आपल्याला प्रबळपणे अवचेतनीय (subconscious) आणि संप्रेरकीय (harmonal) पद्धतीने प्रोत्साहित करत असतात. प्रेमात असण्याच्या अवस्थेत जो परिणाम मानवी मेंदूवर होतो त्याच प्रकारचा परिणाम समाज माध्यमे निर्माण करतात. अगदी दहा मिनिटेही समाज माध्यमे वापरल्यानंतर ऑक्सिटोसिनचे प्रमाण -ज्याला प्रेमाचे संप्रेरक असेही म्हणतात- १३ टक्यांनी वाढते. समाज माध्यमाच्या आहारी गेलेल्या लोकांना त्याच प्रकारच्या लक्षणांची अनुभूती येते जी अमली पदार्थांच्या आहारी गेलेले लोक अनुभवतात-जसे की प्रत्याहरण लक्षणे (withdrawal symptoms), दुराचार परतणी (relapse), आणि मनःस्थिती फेरबदल. आपण समाज माध्यमांना मुद्दाम कवेत घेतो असे म्हणणे अचूक ठरेल का जेव्हा असे कवेत घेण्याला व्यसनी गुणधर्म जोडलेली आहेत?
समाज माध्यमांच्या भावनिकदृष्ट्या लक्षवेधक आणि व्यसनकारक बाजू उंचावण्यावर केंद्रित असणाऱ्या संशोधनामध्ये अशा कंपन्या विलक्षण संसाधने ओतत राहतात. अशा कंपन्या हे जाणून आहेत की लोकांचा दुर्मिळ वेळ आणि ध्यान यासाठीची स्पर्धा जिंकायची तर उपभोक्त्यासाठी अनिवार्यता निर्माण करावी लागेल. सतत गुंतवून ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, समाज माध्यम कंपन्या अशा पद्धतीचा वापर करतात ज्यांचा संबंध बी.एफ. स्कीनर (१९०४-१९९०) या मानसशास्त्रज्ञांशी आहे. त्यापैकी एक म्हणजे व्यापारक अभिसंधान (operant conditioning) जो दंड आणि बक्षीस/प्रतिफल (punishment and reward) यांच्या व्यवस्थेतून वर्तवणूक बदल घडवून आणण्यावर आधारित आहे. अशी वर्तवणूक ज्याद्वारे सुखद परिणाम घडून येतात त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते.
समाज माध्यमातील व्यापारक अभिसंधान चे उत्तम उदाहरण म्हणजे क्रिया-अनिवार्यता फास (compulsion loop). विविध समाज माध्यमांमध्ये क्रिया-अनिवार्यता फास दिसून येतो आणि विशेषतः ऑनलाईन खेळांमध्ये. अशी माध्यमे “परिवर्ती गुणोत्तर प्रबलन” (variable-ratio reinforcement) याद्वारे कार्य करतात ज्या मध्ये बक्षीस/प्रतिफल अंदाज लावता येणार नाही अशा पद्धतीने वितरीत केली जातात. अपेक्षित वर्तनामध्ये अव्याहत वाढ करण्यासाठी परिवर्ती गुणोत्तर प्रबलन हे प्रभावी ठरते ज्याद्वारे मानवी मेंदूमधील डोपामिन संप्रेरकाच्या कार्यमार्गावर परिमाण होतो. वापरकर्त्याला खेळ सतत खेळण्याच्या मोह पाडण्यासाठी अशा विविध खेळाचे रचनाकार परिवर्ती गुणोत्तर प्रबलनचा उपयोग करतात.
वापरकर्ते जसेजसे खेळत राहतात, हळूहळू त्याच्या व्यसनी जातात, दरम्यान अशा खेळाचे उपयोजक वापरकर्त्याचे उपकरण, आवडी, हालचाली आणि इतर बऱ्याच गोष्टींबद्दल अधिकाधिक माहिती समजून घेतो. समाज माध्यम कंपन्या अगदी हे देखील जाणून घेऊ शकतात की तुम्ही रिकामपणात कधी आहात आणि त्यांनी असे देखील तंत्र आणि साधने विकसित केले आहे ज्याद्वारे तुम्हाला पुन्हा उपकरणाकडे खेचले जाईल: जसे कि उपयोजकाच्या प्रतिमेवरील लालसर लहान बिंदू, फलक पटलावरील सूचना (banner notifications), कंपन.
लोकांना गळाला लावण्यासाठी समाज प्रसारण जाळ्यांचे संकेतस्थळ कोणत्या पद्धती वापरतात याबाबत फेसबुकचे पहिले अध्यक्ष सीन पार्कर यांनी अलीकडे एक लक्षणीय कबुली दिली होती. पार्कर यांनी वर्णन केली की कशा प्रक्रारे विविध सोयी जसे कि “पसंती कळ” (like button) हे वापरकर्त्याला “हलकासा डोपामिनचा तडखा” देण्यासाठी रचण्यात आले आहे. त्यांनी असे स्पष्ट केले की: “अशा सुविधा एक सामाजिक-प्रमाणीकरण पश्चप्रदाय फास (social-validation feedback loop) आहे जे माझ्यासारखा संगणक अंतर्भेदनकच (hacker) संकल्पित करून आणू शकतो कारण याद्वारे मानवी मनोविज्ञानची विकारक्षमता पडताळली जातेय”. जसे गुगल मधील पूर्वीचे एक कर्मचारी ट्रीस्टन हॅरीस यांनी अनिष्टसूचकतेने भाष्य केले आहे की “आपल्या निवडी त्याप्रमाणात मुक्त नाही जेवढे आपण समजतो”.
ज्या उद्योगांमध्ये व्यसनाधीनता हा घटक आहे (जसे तंबाखू, जुगारगृह) तशाचप्रकारे समाज माध्यमांच्या वापरकर्त्यांना बऱ्याचवेळा वर्तवणूक बदल तंत्र याबाबत अंधुक कल्पना असते, जे असे उद्योग चालविणारे आणि त्यांचे पगारी सल्लागार सखोलपणे अभ्यास करून लागु करत राहतात. उपभोक्त्यांवर मनोवैज्ञानिक प्रयोग करत राहणे हे उत्पादनाचे परिष्करण करण्यासठी आवश्यक आहे. नैतिक परीक्षणाच्या अभावामुळे असे प्रयोग काहीवेळेस अनिष्ट मार्गाकडे जातात. यामध्ये सर्वात कुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे जानेवारी २०१२ मधील फेसबुकने केलेला प्रयोग ज्यामध्ये ६८९,००० पेक्षा जास्त वापरकर्त्यांच्या भावनांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी हेतुपूर्वक त्यांच्या बातमी प्रदायकापासून (news feed) सकारात्मक किंवा नकारात्मक घटक बाजूला ठेवले गेले. या प्रयोगातून असे दिसले की अशाप्रकारची हाताळणी कार्यक्षम ठरली कारण वापरकार्त्यांमध्ये “भावनिक संसर्गाची” लक्षणे दिसून आली-जवढे कमी सकारात्मक आशय त्यांनी पहिले, तेवढे कमी सकारात्मक त्यांचा स्वतःचे स्तंभलिखाण(posts) होते, तर नकारात्मक आशयाचे घटक दृष्टीत पडण्यापासून कमी केल्यास त्यांनी स्वतः कमी नकारात्मक आशयाचे स्तंभलिखाण केले. जेव्हा २०१४ मध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित झाल्यावर व्यापक पातळीवर लक्ष खेचत होता तेव्हा आकादमिक समुदाय अशा संशोधकांचे स्पष्टपणे निषेध करत होता कारण प्रयोग करण्यापूर्वी प्रयोगात समविष्टीत लोकांची माहितीपूर्ण समंती घेण्यास ते अपयशी ठरले होते. तरीपण त्यांचे धक्कादायक परिणाम राहिलेच: समाज माध्यम कंपनीला असा मार्ग सापडला ज्याद्वारे “व्यक्तिगत पातळीवर ग्राहकांचा क्षीणपणा फक्त उघडच नाही करत तर त्यास चेतवते देखील”.
आपण ज्या व्यवस्थेवर अवलंबून आहोत आणि जी आपल्या जीवनाला आकार देते त्याबद्दलची असणारी सुरुवातीची भीती ओसरन्यात समाज माध्यमे बऱ्याच प्रमाणात “मुद्दाम” वापरण्याच्या आपल्या कृतीचा उगम आहे. समाज माध्यमांचे वर्णन करण्यासाठी जे “अभ्र” (cloud) हे रूपक वापरले जाते त्यातून अशा प्रकारच्या अस्पष्टतेची स्थिती उघड होते. “अभ्र” काय आहे? चिमुकल्या सुक्ष्मप्रक्रीयकामध्ये (microprocessor) दडलेल्या गणनविधीचे थरावर थर जे प्रसारण जाळ्याशी जोडलेले आहे आणि ते अशा माहिती-प्रक्रीयकाच्या (data-processors) वखारात भरणा करत राहते जे पर्वताच्या खाली भूमिगत किंवा काटेरी कुंपणाच्या पलीकडे अदृश्य आहे. असा सबंध उपक्रम हा बौद्धिक मालमत्ता हक्क आणि अप्रगटनिय करार (nondisclosure agreement) याद्वारे संरक्षित केला जातो. जरी समाज माध्यम कंपन्या त्यांची उत्पादने आपल्या दैनंदिन अस्तित्वाच्या दृष्टीआड कायम सुरु आणि सतत वापरात ठेवण्यासठी प्रयत्नशील असतात तरीही त्यांच्या तंत्रज्ञानात्मक, भौतिक, आणि कायदेविषयक प्रचंड आधारभूत संरचना आपल्या जीवनावर नियंत्रण कार्यान्वित करीत आहेत आणि तरीही अजूनही आपण त्यास गृहीत धरतोय आणि अल्पप्रमाणत त्याची चिकित्सा करतोय.
परस्परांशी विविध माहिती सामायिक करण्याच्या मित्रांच्या कृती भोवती समुच्चयित झालेल्या दृढविश्वासाचा फायदा समाज माध्यम कंपन्या घेतात व त्याद्वारे आपण जाहिरातदारांना माहिती सामायिक करू या हेतूने आपल्याशी चालबाजी करतात. योजना अशी आहे की आपल्याला आत्मसंतुष्टी मध्ये निजवले जाते जेणेकरून अशा सेवा वापरताना आपल्या वर केली जाणारी तीव्र पाळत व त्यामागील रचना याकडे आपण लक्ष देणार नाही. जर समाज माध्यमांची अखंडीत लोकप्रियता लक्षात घेतली तर असे दिसते की ही योजना काम करतेय.
सामाज माध्यमे प्राधिकारवादी आचरण प्रावाहित करतात:
समाज माध्यमांबाबत शेवटचे आणि सर्वात त्रासदायक सत्य म्हणजे ते प्राधिकारवादी (authoritarian) आचरणाला प्रोत्साहन देतात. समाज माध्यमे प्राधिकारवादाशी केवळ सुसंगतच नाही तर जगामध्ये प्राधिकारवादी आचरण पसरण्याचे ते एक प्रमुख कारण ठरू शकतात. एखादे विशिष्ट आचरण जे प्राधिकारवादी आहे ते अशी राजवट नसणाऱ्या ठिकाणी देखील उद्भवू शकते. प्राधिकारवादी आचरणाचा हेतू लोकांना नियंत्रित करणे आणि गोंधळ, अज्ञान, पूर्वग्रह आणि अनागोंदी यांची पेरणी करणे आहे जेणेकरून सार्वजनिक उत्तरदायित्व क्षीण होईल.
अंकीय तंत्रज्ञान हे प्राधिकारवादी अचारानाशी विसंगत ठरतील या जुन्या आणि सर्वव्यापक धारणेचे आश्चर्यकारकरीत्या उलटफेर होणे हे अशा वेदनादायक सत्याच्या केंद्रस्थानी आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की हे प्रचलित शहाणपण चुकीचे आहे. खरे पाहता समाज माध्यमे प्राधिकारवादी आचरणाच्या प्रसारणाचे वाहक आहेत.
समाज माध्यमे प्रचंड आकारमानाची जी माहिती निर्माण करतात त्याचा सार्वजनिक चर्चाविश्वावर पडणारा परिणाम लक्षात घ्या. “माहिती अतिभार” (information overload) संबंधीची आपली चिंता ही योहानस गुटनबर्गच्या मुद्रणालया इतकीच जुनी आहे, तरी नि:संशयपणे आपण अशा बिंदू पर्यंत येवून पोहोचलोय जिथे माहितीची निखालस मात्रा एक गुणात्मक विस्थापन निर्माण करत आहे. ट्विटर च्या म्हणण्यानुसार ते प्रती सेकंद सहा-हजार नवीन ट्विटचे आतिथ्य करतात , त्यानुसार एका वर्षात दोनशे अब्ज ट्विट होतात. जवळपास दीड अब्ज लोक दररोज फेसबुक वर लॉगीन करतात. प्रत्येक मिनिटाला ३.८७ दशलक्ष शोध गुगल वर पडत असतात आणि सात नवीन लेख विकिपीडियावर संकलित होतात. आणि त्यात प्रचंड मोठ्या मानववंशचा समुदाय अशी उपकरणे हाताळत आहेत जे सतत चालू आणि जोडलेले आहे.
समाज माध्यमाचे जग हे प्रतिस्पर्धी आणि जटील कथनाबाबत शांत आणि तत्वयुक्त विचार करण्यासाठी पोषक असण्यापेक्षा आत्यंतिक, भावनेने प्रभारित, आणि फुट पडणाऱ्या आशयासाठी अधिक हितावह आहे. विवेक आणि विमर्शावर आधारित सत्याचा शोध आणि मतैक्याचा पाठलाग आता मागे पडत चाललाय. समाज माध्यमांवरील माहितीचा पूर आणि जनमतांची कर्णकटुता सार्वजनिक चर्चाविश्वाची अधोगती घडवून आणतेय. माहिती अतिभाराच्या स्थितीशी सामना करताना उपभोक्ते संज्ञानाचा असा सोपा मार्ग निवडतात जो त्यांना अशा मतांकडे नेतो जो त्यांच्या प्रचलित श्रद्धेशी सुसंगत असतो. त्याचवेळेला समाज माध्यमांकडे अशा गणनविधीची मालकी आहे जी वापरकर्त्यांना “निस्यंदक बुडबुड्या” (filter bubble) कडे निर्देशित करते जिथे ते सुखदायक आणि वैचारिक दृष्ट्या पंक्तिबद्ध असण्याचा अनुभव घेतात.
सतत कार्यान्वित असणारी, वास्तविक वेळेत (real time) निर्माण होणारी माहितीची सुनामी ही खोटेपणा, कट सिद्धांत, अफवा आणि “माहिती गळती” यांचा प्रसार होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करते. अप्रमाणित दावे आणि कथन वेगाने पसरतात तर तथ्य तपासणीचे प्रयत्न मात्र संघर्ष करत मागे राहतात. सामान्य जनता , त्याच बरोबर संशोधक आणि शोध पत्रकार यांच्याकडे कदाचित विविध दाव्यांची पडताळणी करण्याचे कौशल्य, तंत्र किंवा वेळ उपलब्ध नसेल. ज्या वेळेपर्यंत ते त्याची तपासणी करतात तोपर्यंत हे असत्य आधीच सामूहिक जाणीवेत खोलवर स्थापित झालेले असते. तथ्य आणि कल्पित यांचे मिश्रण करत नवीन अपप्रवाद किंवा विक्षिप्त दावे यांचा वापरकर्त्यांवर सतत वर्षाव होत राहतो. वाईटात भर म्हणजे अभ्यासातून असे लक्षात आले आहे की “अफवांना ठेचण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष खंडन केल्याने त्यांचा प्रवाहीपणात वाढ होवून त्यांचा प्रसार सुकर होतो”. वेगळ्या शब्दात सांगायचे तर असत्याची संशुद्धी करण्याचे प्रयत्न त्यांचा प्रसार आणि अगदी स्वीकार होण्यास उपरोधिकपणे योगदान देवू शकते. दुषित माहिती गळती , कट सिद्धांत, आणि इतर चुकीच्या माहितीचा सततचा भडिमार हे सर्वतुच्छततेची (cynicism) भावना पेटवतात, त्याचवेळेस नागरिक थकतात कारण बातम्यांच्या पुरात वस्तुनिष्ठ सत्याचा तपास करण्याच प्रयत्न ते करत राहतात. सर्वच माध्यमांच्या सचोटीवर प्रश्न निर्माण करणे-जे कि प्राधिकारवादाचे एक ध्येय आहे- एक प्रकारच्या दैववाद आणि धोरण लकव्याकडे जावू शकते.
द्वेषपूर्ण किंवा चुकीची माहिती उपटून फेकण्यास अनिच्छा किंवा असमर्थ असणाऱ्या समाज माध्यम कंपन्यांची कृती (किंवा निष्क्रियता) या समस्येमध्ये भर टाकते. २०१८ मधील अभ्यासानुसार लक्षात आले की २०१६ च्या अमेरिकन निवडणुकीनंतर लोकांचा आणि शासनाचा प्रचंड दबाव असताना देखील “२०१६ च्या निवडणूक प्रचारा दरम्यान ज्या खात्यांनी वारंवार चुकीची माहिती पसरवली त्यापैकी ८० टक्के खाती अजूनही सक्रीय आहेत आणि सर्वसाधारणपने एका दिवसात ते दशलक्षा पेक्षा जास्त ट्विट अजूनही प्रकाशित करत आहे”.
एक अभ्यास असा अंदाज देतो की ट्विटरच्या सक्रीय “वापरकर्त्यांपैकी” ९ ते १५ टक्के हे खरेतर स्वयंचलित मानवविरहीत कार्यवाहक (bot) आहे. जुलै २०१८ मध्ये जेव्हा हे उघड झाले की ही सूक्ष्मअनुदिनी (microblogging) सेवा दिवसाला लाखो बनावटी खाती काढून टाकत आहे तेव्हा तिच्या समभागांच्या किमतीमध्ये तीक्ष्ण घसरण झाली-जे अशा व्यापारी शहाणपणाचे संकेत होते की स्वताची बनावटी खात्यापासून सुटका करून घेण्यासाठी स्वताच्याच व्यासपीठामध्ये खूप खोलवर खोदू नये. सप्टेंबर २०१८ मध्ये फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरील सॅंडबर्ग यांनी अमेरिकेच्या सिनेट समितीला असे सांगितले की त्यांच्या कंपनीने ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान १.३ अब्ज बनावट खाती काढून टाकली आहेत. विद्वेषपूर्वक कर्ते चुकीची माहिती अति वेगाने पसरविण्यासाठी व्हॉट्सॲप समूहा बरोबरच रुपांतरीत छायाचित्रे आणि दृश्ये ज्याला “गर्त बनावटी” (deep fakes) संबोधले जाते याचा वापर करत आहेत. समाज माध्यमांना पूर्वीच्या पद्धतीपेक्षा ह्या तंत्राशी सामना करणे अधिक कठीण आहे आणि राजकीय क्षेत्रात निश्चितच अपकीर्ती व कृष्णखंडणीमय प्रचार (blackmail campaigns) करण्यासाठी हे कुरणच ठरणार आहे. साफसफाईचे प्रयत्न झाले असले तरी, जो पर्यंत अधिकाधिक उपभोक्ता गोळा करणे हे अशा व्यापारच्या केंद्रस्थानी आहे तोपर्यंत चुकीची माहिती पसरविण्याच्या अनुषंगाने समाज माध्यमे हे उपभोग घेण्यसाठी सुकरच ठरतील. २०१८ च्या मध्यात रशियन ट्रोल असल्याचा आव आणलेल्या संशोधकांना राजकीय जाहिराती विकत घेण्यास रोखण्यापासून गुगलच्या चमूला अपयश आले. या संशोधकांनी रशियन चलनामध्ये शुल्क भरले आणि रशियन पिनकोड वापरून नोंदणी केली. त्यांनी असे निर्देशक वापरले ज्याद्वारे त्यांच्या जाहिराती इंटरनेट रिसर्च एजन्सी या संघटनेशी जोडता येतील आणि ही तीच ट्रोल संघटना आहे जीची अमेरिकन कॉंग्रेसने तीव्र तपासणी केली आणि तिच्यावर विशेष सल्लागार अभ्यारोप लागू केले होते. जी व्यवस्था जाहिरातीच्या माध्यमातून महसूल मिळवते ती अस्सल कर्ता व दृष्ट घटक यामध्ये भेद करताना काळजीपूर्वक भूमिका वापरन्यात चूक करते हे पटण्यासारखे नाही.
वापरकर्त्याचे आकर्षण व त्याचे लक्ष राखून धरण्यावर केंद्रित असणारे समाज माध्यमांचे व्यापारी प्रारूप जो पर्यंत आहे तो पर्यंत स्वतःच्या व्यासपीठाचे शुद्धीकरण करण्यासाठी समाज माध्यम कंपन्या कोणती कृती करतात किंवा करीत नाही, जी की अधिक मुलभूत समस्या आहे, त्याची योग्य दखल घेतली जाण्याची शकत्या कमी आहे. सध्य परस्थितीत असे आहे की पाळतखोर अर्थव्यवस्थेच्या गाभास्थानी असणारी गणनविधीद्वारे चालणारी जाहिरात व्यवस्था आत्यंतिक, चुकीचे आणि जहाल आशय उघड करते आणि पुढे ढकलत राहते जरी कोणत्याही द्वेषमुलक कर्त्याने असे आशय रोवले असतील तरी. वॉशिंग्टन पोस्टच्या नोंदी नुसार ऑनलाईन जाहिरात व्यवस्था “मुख्य जाहिराती नियमितपणे राजकीय उपांत घटकांच्या (fringe) आशयाच्या बाजूलाच टाकते आणि ध्रुवीकरण घडवणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या अधिभारीत मथळे तयार करणार्यांच्या खिशात डॉलर्स टाकते”. यापैकी सर्वाधिक काळजीचा मुद्दा म्हणजे असे आशय जे माध्यमांच्या द्वेषात्मक भाषण किंवा हिंसेचे समर्थन यावर असणाऱ्या बंदीचे उल्लंघन करीत नाहीत तरी देखील असे आशय भावनोत्कट किंवा इतर सनसनाटी चेतवणाऱ्या घटकांचा वापर करून कट सिद्धांत, चुकीची माहिती किंवा मतप्रचार (propaganda) पुढे ढकलत राहतात. अशा प्रकारचे आशय हे सर्वाधिक कावेबाज असू शकतात कारण समाज माध्यम कंपनीच्या कार्यतत्पर यंत्रणेला त्यांचा सहज शोध घेणे कठीण आहे परंतु असे आशय मोठ्या संख्येने उपभोक्त्यांना आकर्षित करतात. फक्त जर एकच उदाहरण द्यायचे असेल तर नुकतेच जर्मनी मधील एका अभ्यासातून असे लक्षात आले की एकसारख्याच नगरपालिकांची तुलना केल्यास ज्या पालिकांमध्ये फेसबुकचा वापर अधिक होतो तिथे निर्वासितांविरोधी हिंसा होण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त असण्याकडे कल आहे.
त्यामुळे यात काही नवल नाही की प्राधिकारवादी प्रवृत्ती असणारे लोक समाज माध्यमे जे अनुकूल वातावरण देवू करतात त्याचा सक्रियपणे लाभ घेत आहेत. ऑक्सफोर्ड इंटरनेट इन्स्टिट्युटने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून असे दिसून आले की ४८ राष्ट्रांमध्ये किमान एक शासकीय संस्था अथवा राजकीय पक्ष असा आहे जो समाज माध्यमाद्वारे जनमतास आकार देण्याचे कार्य करतोय. प्राधिकारवादी मानसिकता असणारे नेते नित्यक्रमाने “बनावट वृत्ताची” झोडपणी करतात तर दुसरीकडे निर्लज्जपणे स्पष्ट खोटेपणा रेटत राहतात. जॅकब वायसबर्ग यांनी त्याचे काही परिणाम नोंदवले आहेत: म्यानमार मध्ये फेसबुक मॅसेंजरवर हिंसकपने जो द्वेष पसरविला गेला त्यामुळे रोहिंग्यांच्या वांशिक संहाराला चालना मिळाली, भारतामध्ये फेसबुकच्या व्हॉट्सॲपवर मुल पळवून नेण्याच्या चुकीच्या अफवांमुळे जमावाला चेतवून निष्पाप नागरिकांचा जनवध (lynching) होण्याच्या घटना घडल्या, फिलिपिन्स, तुर्की आणि इतर अधोगतीस गेलेल्या लोकशाहीमध्ये “देशभक्त ट्रोलचे” टोळके चुकीची माहिती पसरविण्यासाठी आणि विरोधकांवर दहशत बसविण्यासाठी फेसबुकचा वापरत करत आहेत. आणि अमेरिकेत समाज माध्यमाच्या जाहिरातीचे तंत्र अजूनही भूमिगत मतप्रचार करण्याचे वाहक म्हणून कार्य करत आहेत. सर्व प्रमुख समाज माध्यम व्यासपीठांपैकी जे सर्वात खुले आणि सैलपण प्रशासित होणारे माध्यम आहे ते म्हणजे ट्विटर व त्या बद्दल थॉमस रीड या राज्यशास्त्रज्ञांनी २०१७ मध्ये असे लिहिले की “ट्विटर हे मुक्त आणि उदारमतवादी लोकशाहीला धोका आहे”. ट्विटरवर वास्तविक नावानिशी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आणि किती खाती तयार करता येतील यावर पण मर्याद्या नाहीत. खातेधारक सहजतेने खाते आणि त्यावरील आशय नष्ट करू शकतात आणि हे माध्यम मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित आहे-जे की तिचा उपभोग घेण्यास अधिक सुकर बनवते. ट्विटरवर स्वयंचलित मानवविरहीत कार्यवाहक (bot) तयार करणे सोपे आहे. बॉट हे कधीही झोपत नाहीत किंवा त्यांचे लक्ष विचलित होत नाही. ते संवादाचे अपहरण करू शकतात आणि चर्चेला विवेकशून्यतेकडे वळवू शकतात. प्राधिकारवाद्यांच्या प्रभावाचे परिचालन करण्यासाठी ट्विटर हे पसंतीचे तंत्र बनले आहे यात काही नवल आहे का?
प्राधिकारवाद्यांचे साधन:
समाज माध्यमांच्या अजून एका वैशिष्ट्याचा लाभ घेऊन प्राधिकारवादी तग धरून आहेत: ते म्हणजे अशा माध्यमांची अंगभूत असुरक्षा. इतरां इतकेच चळवळीतील कार्यकर्ते, असंतुष्ट गट आणि पत्रकार हे
समाज माध्यमांवर विसंबून असतात. विश्वास, जवळीक आणि सामायीकीकरण यांना उघडपणे चालना देणाऱ्या अशा व्यासपीठांनी प्राधिकारवाद्यांना असा सोपा मार्ग उघडून दिलाय ज्याद्वारे त्यांच्या हितसंबंधाना धोका निर्माण करणाऱ्या सामाज प्रसारण जाळ्यांमध्ये घुसखोरी आणि त्यांचा भंग करू शकतात. या डावपेचांमध्ये स्वस्त परंतु प्रभावी साधने जसे की फूस लावून फसवणूक करणे ( phishing) आणि समाज अभियांत्रिकी मोहीम (फसवणूक करून संवेदशील माहिती चोरणे) पासून ते अगदी लक्ष्यगटांच्या उपकरणाला संक्रमित करणारे परिष्कृत, आणि पाळत ठेवणारे धंदेवाईक यंत्रे-तंत्रे (spyware) यांचा समावेश होतो (सहज दुरुपयोग करता येण्याजोग्या अशा पाळत तंत्रांचे एक मोठे आणि अपुरे नियमित असणारे बाजारपेठ अस्तित्वात आहे).
अशा आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी लागणारे विशिष्ट ज्ञान आणि क्षमता याची नागरी समाजाकडे कमतरता आहे. उपयोगकर्त्यांचे रक्षण करण्यासाठी समाज माध्यम कंपन्यांनी जरी काही प्रशंसनीय पाऊले उचलली असतील तरी समाज माध्यमांच्या व्यापारी प्रारूपामध्ये अंगभूत असणारे तीव्र माहिती सामायीकीकरण अशा उपाययोजनांच्या परीणामककतेवर मर्याद्या टाकतात. समाज माध्यमांच्या कृपेने आत हुकुमशहा सीमेपार जाऊन आणि शांतपणे खिसा, कागदपत्रे आणि असंतुष्ट गटांचे संवाद व्यवहार यांची चोरू करून, गुप्तपणे त्यांच्या कार्यावर वर कान आणि डोळा ठेवू शकतात, बहुतेकवेळा याचे धोकादायक परिणाम राहतात.
येथेही असेच दिसले की सुरुवातीला जे प्रचलित शहाणपण होते ते आता चुकीचे ठरले आहे: अनेकांचा असा विचार होता की समाज माध्यमे बहुसिमापारी नागरी समाजाचे (transnational civil society) सबलीकरण करतील, परंतु असे दिसतेय की समाज माध्यमे नागरी समाजाचे संथपणे देहांत घडवून आणण्यात योगदान देत असावेत.
सरतशेवटी सांगायचे तर आर्थिक कारणांसाठी समाज माध्यमे जी अतिसूक्ष्म पाळत ठेवतात ते प्राधिकारवादी नियंत्रणाचा अत्यंत मोहक आडत्या (proxy) बनला आहे हे सिद्ध होतय. जर खाजगी क्षेत्राकडे आधीच स्वतःची पाळतखोर यंत्रसामुग्री असताना शासन स्वतः अशी व्यवस्था का बांधत आहे? एडवर्ड स्नोडन यांनी २०१३ मध्ये अमेरिकन नॅशनल सेक्युरिटी एजन्सीच्या संदर्भात जे उघड केले त्यातून हे लक्षात आले की सामाज माध्यमे कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्थांना जी माहिती पुरवतात ती आता अधिकाऱ्यांच्या “सर्व काही गोळा करा” या दृष्टीकोणासाठी आवश्यक आहे. आणि जरी पाश्चत्य उदारमतवादी लोकशाही अशा सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे अपरिपूर्ण कायदेशीर संरक्षणाद्वारे का असेना नियमन करत असतील तरी प्राधिकारवादी राजवट पूर्णपणे एक वेगळी परस्थिती आणि अधिकाधिक लाभदायी होत जाणारी व्यापारी संधी यांचे प्रतिनिधित्व करते.
पीपल्स रीपब्लिक ऑफ चायना (PRC) हे एक अनिष्टसूचक प्रारूप प्रदान करते. चीनचे सरकार समाज-माध्यम समूह जसे की अलीबाबा आणि टेनसेंट यांच्या सोबत कामकाज करत आहे ज्याद्वारे ओवेलीयन (जॉर्ज ओवेल यांच्या “1984” या पुस्तकातील घटनांशी साम्य असणारी परिस्थिती) सारखी वाटणारी अशी समाज पत व्यवस्था ( Social Credit System) उभी केली जातेय ज्यामध्ये नागरिक आणि व्यापारगट यांच्या प्रतिष्ठेची क्रमवारी त्यांनी केलेली खरेदी, त्यांच्या हालचाली, सार्वजिक संवाद व्यवहार याआधारे केली जाईल आणि त्या क्रमवारीच्या आधारावर नौकरी, प्रवास आणि कर्ज यांची उपलब्धता निर्बंधित केली जाईल. चीनमध्ये कामकाज करणाऱ्या कंपन्याना चीनच्या २०१६ च्या सायबर कायदायचे अनुपालन करणे अनिवार्य आहे ज्यामध्ये स्वताच्याच प्रसारण माध्यमावर देखरेख ठेवणे, खाजगी संभाषणे आणि सार्वजनिक स्तंभलिखाणाचे शांतपणे अभ्यवेक्षण (censor) करणे, चीन मधील अधिकारी जेव्हा मागणी करतील तेव्हा अशी माहिती त्यांच्यासोबत सामाईक करणे अशा गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे.
पाश्चिमात्य कंपनी जसे की अॅपल, फेसबुक आणि गुगल यांनी सुरुवातीला वापरकर्त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा डंका पिटला. परंतु आता चीनमधील फोफावत असलेल्या , प्रचंड अशा बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे घुमजाव केले आहे (एका राष्ट्रीय सीमारेषेत चीन मध्ये जगात सर्वाधिक इंटरनेट वापरकर्त्यांचा संचय आहे). नुकत्याच झालेल्या माहिती गळतीमधून हे लक्षात आले आहे की २०१० मध्ये गुगलने तात्विक आधारवर चीन मधून माघार घेतली होती आणि आता त्या भूमिकेपासून गुगल उलटी फिरली आहे. ही कंपनी केवळ चीन साठी एक शोध संकेतस्थळ (search engine) जिला प्रोजेक्ट ड्रॅगनफ्लाय हे सांकेतिक नाव दिले आहे ते तयार करत आहे. हे संकेतस्थळ, मिळालेल्या परिणामांवर (search result) अभ्यवेक्षण करू शकेल कारण ती कोण उपयोगकर्ता आहे हे शोधू शकते ज्याद्वारे सुरक्षा संस्थाना कोण काय शोधतोय हे समजू शकेल. चीन मधील बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी २०१८ च्या सुरुवातीला अॅपलने देखील अशाचप्रकारची तडजोड केली. चीनमधील नागरिकांची आय क्लाउड (iCloud) खाती पोसण्यासाठी ही कंपनी आता चीन मधील ग्वेझ्यो (Guizhou) प्रातांत सरकारद्वारे पुरवली जाणारी सुविधा वापरतेय. दरम्यान फेसबुकचे मुख्य मार्क झुकरबर्ग चीन मधील व्यापारी संधी बाबत आपली उत्सुकता जेमतेम थोपवू शकले. समाज माध्यमांच्या व्यवस्थापनाचे यशस्वी वाटणारे हे प्रारूप फक्त चीन पुरताच मर्यादित राहणार नाही. जगातील हुकुमशाही व्यवस्था आता चीनमधील कंपन्या आणि त्यासोबत येणारे प्राधिकारवादी तत्वे आणि आचरण या बद्दल अधिक ग्रहणक्षम सिद्ध होत आहेत. हुकुमशाहीचा नाश करणे तर दूरच, उलट समाज माध्यमे त्यांच्या मित्रांमधले उत्तम मित्र सिद्ध होत आहेत.
सामाज माध्यमे विषमुक्त होवू शकतात का?
सदर वेदनादायक सत्य हे उदारमतवादी-लोकशाहीच्या आचरणाच्या भविष्याचे निरुत्साही आणि त्रासदायक भाकीत निर्देशित करते. मागील काही वर्षात आपण ज्या नव-फॅसिस्टवाद, टोळक्यांचे राजकारण, अज्ञान आणि पूर्वग्रह पसरण्याच्या परिस्थितीचा अनुभव घेत आहोत त्यात समाज माध्यमे काही प्रमणात दोषी आहेत हे आता निर्विवाद आहे. खाजगी-माहितीची पाळत आणि प्राधिकारवादी आचरण एकत्र व्यवस्थित जुळतात आणि ते अशा अंतहीन व्यापारी संधी मध्ये गुंतले गेले आहेत जे मोठ्या नफ्याची शाश्वती तर देते परंतु उत्तरदायित्वाची क्षति, विभाजनाचे बीजरोवन, अज्ञानाचा प्रसार आणि हुकुमशाही नियंत्रण लादणे असे धोके देखील निर्माण करते.
एकदा हे समजून घेतल्यावर हे स्पष्ट होते की कंपनीने स्वीकारलेले ऐच्छिक धोरण किंवा मूठभर नियमन याद्वारे सामाज माध्यमांशी केलेल्या किरकोळ तडजोडीचा क्षुल्लक परिणाम असेल. खाजगीत्वाचे रक्षण किंवा नेटवर्क वर देखरेख ठेवण्यासठी उत्तम कामगिरी करण्याचे आश्वासन समाज माध्यम कंपनीच्या कार्यकारणीने देण्यामागे कदाचित अस्सल चांगला हेतू असेलही, परंतु असे व्यासपिठ ज्या अनिवार्य व्यावसायिक गाभ्यातून निर्देशित होते त्यामुळे त्यांच्या अशा प्रतीज्ञांची परिणामकारकता साशंक बनते.
समाज माध्यमांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारा पुरविल्या जाणाऱ्या सेवांचे नकारात्मक बाह्य परिणाम रोखण्यासाठी ज्या व्यापार प्रारूपारवर अशा सेवा आधारित आहात ते पूर्णपणे नष्ट न करता अशा कंपन्याना कशा प्रक्रारे नियंत्रणात ठेवता येईल? वर मांडलेले परिणाम सौम्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांची व्याप्ती आणि मापन यांची कल्पना करणे हे दडपण आणणारे आहे. अल्पावधीतच अंकीय तंत्रज्ञान हे सर्वव्यापक आणि आपण जे जे करतो त्यामध्ये अंतर्भूत झाले आहे. त्यांना गुंडाळून ठेवणे शक्यही नाही आणि इष्टही नाही. आपल्या ग्रहाचे आणि आपल्या व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एक खुले आणि सुरक्षित जागतिक संवादाचे साधन आवश्यक आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सध्याची खाजगी पाळतीवर आधारित असणारी रचना या ध्येयाच्या विरोधी जाणारी आहे.
उदारमतवादी लोकशाही पूर्ववत करण्यासाठी आपल्याला जीवन शैली मध्ये परिपूर्ण बदल करावे लागतील. सहाजिकच हे करणे सोपे नाही , ते एका रात्रीतही घडणार नाही. याच्या विरुद्ध ढकलणारे अवाढव्य सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाह राहतीलच. त्यामुळेच वैयक्तिक ते राजकीय, स्थानिक ते जागतिक अशी विस्तार असणारी दूरवरच्या सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक व्यूहनिती आवश्यक आहे. आपण आपल्या खाजगी पर्यावरणाला असेच समजावे जसे आपण आपल्या नैसर्गिक पर्यावरणाला समजणे अपेक्षित आहे-ज्याचे आपण संरक्षक म्हणून नेतृत्व करतो आणि ज्याच्याशी आपण काळजी आणि संयम या भावनेने वागत असतो. जर उर्जेचे संरक्षण करणे हे शहाणपणाचे असेल तर माहितीच्या उपभोगाचे संरक्षण करणे हे देखील शाहाणपणाचे आहे. त्यासोबतच आपण अशा प्रकारची सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण केलीच पाहिजे जिचे अधिष्ठान माध्यम साक्षरता, नैतिकता, सौजन्यता आणि सहिष्णुता असेल.
कंपनी आणि शासन ज्या मेहनतीने सर्व खाजगी माहिती गोळा करत आहेत त्याचे ते काय करतात हे जाणून घेण्याचा अधिकार राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रात नागरिकांना मिळाला पाहिजे. हुकुमशाही राजवटींना उत्तरदायी बनवून अशा अधिकाराचा आंतरराष्ट्रीय विस्तार करणे निर्णायक ठरेल. मानवी अधिकारांचे उल्लंघन करणारे आणि नागरी समाजास इजा पोहोचविणारी उत्पादने आणि सेवा यांची विक्री करण्यापासून कंपन्यांना बंदी घातली पाहिजे. त्याचवेळेस समाज माध्यम कंपन्याना अशा स्वतंत्र संस्थाच्या कडक निरीक्षणाखाली ठेवावे लागेल ज्यांच्याकडे असे वास्तविक अधिकार आहेत ज्याद्वारे अशा कंपन्यांना उत्तरदायी ठरविले जाईल. कायदेमंडळांनी समाज माध्यम कंपन्यांना शासित करणारे कठोर मक्तेदारीविरोधी कायदे (antitrust law) पारित केले पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी अशा कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. हे उद्योग क्षेत्र आत्यंतिक केन्द्रित आहे, ज्यामध्ये अवाढव्य सत्ता धारण केलेल्या काही थोड्याच कंपन्यांचे वर्चस्व आहे. हे बदलणे आवश्यक आहे.
शेवटी, जग हे अशा तंत्रज्ञानात्मक नाविन्यासाठी ओरड देतोय जे आत्यंतिक केंद्रीय, तीव्रपणे पाळत ठेवले जाणारे आणि सहजासहजी दुरुपयोग होणाऱ्या समाज माध्यम कंपन्यांच्या बलाढ्य व्यासपिठा पलीकडे जाऊन वितरीत संवादाचे साधन खुले करून देवू शकेल. लोकांना परस्परांशी जुळविण्यासाठी जी मोठी पाउले आपण उचलली आहे त्यांचे जतन करून आणि त्यांना पृथ्वीच्या कोणत्याही ठिकाणाहून प्रचंड साठवलेली माहिती मिळविता येण्याची मुभा तशीच ठेवून परंतु असे होत असताना अनैतिक सहज प्रवृत्तीकडे ते वळविले जाणार नाही हे आपले उदिष्ट्य असले पाहिजे. असे कार्य प्रचंड मोठे आहे परंतु आपण खाजगी माहिती पाळतीच्या विषारी जगातील घातकी स्थितप्रज्ञता टाळली पाहिजे. खूप उशीर होण्यापूर्वी आपण एका उत्तम जगाची कल्पना करणे आवश्यक आहे आणि त्यास प्रत्यक्षात देखील आणले पाहजे.
Коментари